निलंगा विधानसभा मतदारसंघ हा कोणत्याही पक्षाची जहागिरी नाही. आगामी विधानसभा निवडणूकीत आघाडी काँग्रेसच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असून या मतदारसंघातून आपण पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विनायक बगदुरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते. मागील १५ वर्षापासून आपण या मतदारसंघाच्या सातत्याने संपर्कात आहोत. पायाला भिंगरी, तोंडात खडीसाखर व डोक्यावर बर्फाचा खडा या ञिसूञीचा अवलंब करुन आपण या मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात आहोत. निलंग्याची जागा आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सुटलेली असली तरी आगामी विधानसभा निवडणूकीत हि जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी आपण पक्षाचे सर्वेसर्वा तथा पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे मागील अनेक दिवसापासून लावून धरली आहे.

त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून ही जागा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घेतली जाईल व राष्ट्रवादी काँग्रेसच या मतदारसंघातून निवडणूक लढेल असा विश्वास बगदुरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.या मतदारसंघात शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आपण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज झालो असलो तरी पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आपल्यासाठी अंतीम राहिल असे बगदुरे यांनी स्पष्ट केले. आपण शेतकरी कुटूंबातील असून प्रस्थापित नसून बहुजन वंचित आहोत. अभियंता या पदाच्या शासकीय सेवेचा राजीनामा देवून आपण गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी राजकारणात उडी घेतल्याचे स्पष्ट केले.आपण निवडणूक लढवावी अशी या मतदारसंघातील जनतेची इच्छा असल्यामुळे आपण जोरदार तयारी चालवली आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाबद्दल बोलताना या मतदारसंघाचे आमदार ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास केला नाही. विकासाच्या नावाखाली आभासी चिञ निर्माण केले असून मतदारसंघाचा समतोल विकास साधण्यात त्यांना अपयश आल्याचा त्यांनी आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसला उज्जवल भवितव्य असून आगामी विधानसभा निवडणूकीत निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रमुख लढत होईल व ही लढत राज्यातील एक लक्षवेधी लढत ठरेल असा अंदाज विनायक बगदुरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: