कोल्हापूर आणि सांगली भागात असणार्‍या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीची पूर पातळी लक्षात घेता, आलमटी प्रशासनासोबत चर्चा झाली आहे. त्यानुसार आलमटी धरणातून 2 लाख क्युसेक्सहून अधिक पाणी सोडण्यात येत आहे. महिन्याभरापूर्वीची पूर परिस्थिती लक्षात घेता, कोल्हापूर आणि सांगली पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थितीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर माहिती दिली. दरम्यान, सर्व भागांवर राज्य सरकारचे लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले.

महिनाभरापूर्वी ओढवलेल्या पुराच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा पुराचे ढग घोंघावू लागले आहेत. शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. भोगवती नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीही धोक्याच्या पातळीकडे चालली आहे. पुराचा धोका लक्षात घेऊन नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच महापूर आला होता. घरेच पाण्याखाली गेल्याने नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ आली होती. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी बरोबरच वित्तहानी झाली होती. मुंबईसह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला होता. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर पकडला आहे.

राधानगरी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भोगवती नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोयना धरणातूनही विसर्ग करण्यात येत असून, पंचगंगा नदीही धोक्याच्या पातळीकडे सरकत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: