शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनुच्छेद ३७०, बांगलादेशी घुसखोर, भुमीपुत्रांना प्राधान्य अशा विविध विषयांवर एकूण ३५ मिनिटे भाषण केले.

तसेच शिवसेनेचा जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध झाला नसला तरी त्यांनी या मंचावरून काही आश्वासनेही महाराष्ट्राला दिली आहेत. यामध्ये दहा रुपयात जेवणाची थाळी तसेच एक रुपयात आरोग्याची चाचणी होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

युतीचे सरकार आले होते तेव्हा एक रुपयात झुणका भाकर ही योजना आणली गेली होती. या योजनेला जनमानसातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. आता शिवसेनेतर्फे दहा रुपयात जेवणाची थाळी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात विद्यार्थीनींची होणारी छेडछाड, अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता तिथल्या विद्यार्थ्यांना बससेवा देण्याचे आश्वासनही उद्धव यांनी यावेळी दिले. 

तीनशे युनीट पर्यंतचा घरगुती वीज वापराचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचेही त्यांनी मंचावरून जाहीर केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

एका महिन्यात २ विजयादशमी आहेत. एक आजची आणि दुसरी २४ तारखेची असे उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिरचा निकाल लागेल म्हणतायत. महिनाभरात, नाहीतर आमची मागणी आहे की विशेष कायदा करून राम मंदिर बांधा असे आवाहन देखील उद्धव यांनी यावेळी केली.

जे वचन आम्ही जनतेला देतो, ते आम्ही पाळतो. म्हणून आम्हाला राम मंदिल हवंय. सत्ता मिळवण्यासाठी मंदिर नकोय. ही देशाची मागणी असल्याचेही ते म्हणाले.  ३७० कलम काढणे हे शिवसेनेचे स्वप्न असल्याचे सांगत देशातून बांगला घुसखोरांना हाकलून काढा, भुमीपुत्रांना प्राधान्य मिळायलाच हवे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: