
डोंबिवलीत दादाच निवडून येणार, बाकी सगळे आदा पादा आहेत, असं वक्तव्य भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केलंय. आज डोंबिवलीत झालेल्या बुद्धिजीवी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत आज भाजपच्या वतीने युवा आणि उद्योजक बुद्धिजीवी वर्गाशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केलं. डोंबिवलीत दादा म्हणजेच रवींद्र चव्हाणच निवडून येणार, बाकी सगळे आदा पादा आहेत, असं त्या म्हणाल्या.
विशेष म्हणजे बुद्धिजीवी संवाद अशा सोज्वळ नावाखाली आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
कार्यक्रमानंतर मात्र, त्यांनी काहीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, डोंबिवली दौऱ्यात त्यांनी लोकलने प्रवास करून प्रवाशांसोबत संवाद साधला.