मुंबई : पोकळ घोषणांप्रमाणे आर्थिक पॅकेजची घोषणादेखील पोकळ ठरू नये, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. पंतप्रधान मोदींनी 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर थोरातांनी ट्विट करून त्यांना टोला लगावला आहे.

 

कोरोनाच्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चार भाषणांमधील मोठ मोठ्या परंतु पोकळ शब्दांतून देशाच्या गरजेचा एक शब्द आज ऐकायला मिळाला तो म्हणजे आर्थिक पॅकेज. गेल्या सहा वर्षातील वेगवेगळ्या पोकळ घोषणांप्रमाणे या आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नयेे हीच अपेक्षा, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

 

नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सकल महसूल उत्पन्नाच्या 10 टक्के म्हणजेच 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये काय अंतर्भूत आहे हे त्यांनी सांगितले नाही.

 

देशाच्या एकंदर प्रगतीकरता व कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्याकरिता जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम केंद्र सरकारने देण्याची तयारी ठेवली पाहिजे, असंही थोरात म्हणाले.


राज्यांना मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी सातत्याने मागणी केल्याप्रमाणे तसेच काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या मागणीनुसार एकंदर मागणी वाढविण्याकरिता प्रत्येक गरजू नागरिकाच्या खात्यात 7500 रुपये रोख रक्कम सरकारने टाकण्याची आवश्यकता आहे.

 

शेतक-यांचा संपूर्ण माल केंद्र सरकारने हमी भावाने खरेदी केला पाहिजे. या पॅकेजच्या माध्यमातून लघु उद्योजकांना तात्काळ लाभ दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: