भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा संपला आहे. आता 12 मार्चपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतून भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन, अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघात पुनरागमन करु शकतात. याबद्दल भारतीय निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी संकेत दिले आहेत.

 

हे तिन्ही खेळाडू मागील काही दिवसांपासून दुखापतीमुळे भारतीय संघाकडून खेळलेले नाही. पण आता हे तिघेही दुखापतीतून सावरले असून नुकतेच हे तिघेही डीवाय पाटील टी20 स्पर्धेतून खेळताना दिसले. या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीवर प्रसाद लक्ष ठेवून आहेत. पंड्या आणि भुवनेश्वर हे दोघेही शेवटचे भारताकडून 2019 मध्ये खेळले आहेत. तर शिखर यावर्षी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत शेवटचे खेळला आहे.

 

प्रसाद एएनआयशी बोलताना म्हणाले, ‘मी इथे डीवाय पाटील टी20 स्पर्धेत शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांना खेळताना पाहण्यासाठी आलो आहे. या तिघांनीही दुखापतीनंतर केलेली प्रगती पाहून मला आनंद झाला.’ असे असले तरी एमएसके प्रसाद आणि त्यांचे निवड समीतीतील सहकारी गगन खोडा यांचा करार समाप्त झाला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वरिष्ठ निवड समीतीतील त्यांच्या जागा भरण्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागविले होते.

 

त्यानंतर बीसीसीआयने या अर्जांमधून अंतिम उमेदवारांची निवडही केली आहे. पण अजून त्यांच्या मुलाखती झालेल्या नाही. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी नव्याने निवडलेल्या अध्यक्षासह संघ निवड करणार की प्रसाद यांच्याच अध्यक्ष्यतेखाली निवड समीती संघ निवड करणार यावर प्रश्नचिन्ह आहे.

 

याबद्दल प्रसाद यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. आम्हाला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. मी याचे उत्तर देऊ शकत नाही.’

 

याबरोबरच न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला मोठ्या धावा करण्यात आलेल्या अपयशाबद्दल प्रसाद म्हणाले, विराट एक चांगला खेळाडू असून एका मालिकेमुळे त्याच्यावर टीका करणे योग्य नाही.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: