नाशिक : आपला पुढील प्रवास ठरवण्यासाठी 12 डिसेंबरला भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवादाचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे नाराज असून आता त्यांची पुढील भूमिका 12 तारखेलाच आपल्याला कळेल. त्याचबरोबर अद्यापही भाजपमधील अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केला.
काल फेसबुक पोस्ट लिहून पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली होती. तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असल्याचे दिसत आहे. आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये पंकजांनी कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे संवाद साधणार आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा 12 डिसेंबर हा जन्मदिवस असल्यामुळेच त्यानिमित्ताने गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. संजय राऊत यांना या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, आमच्या संपर्कात अनेक नेते असून 12 डिसेंबरला पंकजा मुंडेची भूमिका स्पष्ट होईल.
दरम्यान, भाजप खासदार अनंत हेगडे यांनी देवेंद फडणवीसांबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यावरुनही संजय राऊत यांनी तोफ डागली. 40 हजार कोटी रुपये परत देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असेल तर ती महाराष्ट्राशी बेईमानी असेल विधानसभेची पायरी चढण्याचा त्यांना अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत खुलासा करतील, यात काळंबेरे नक्कीच आहे, सत्य लवकरच समोर येईल, असे संजय राऊत म्हणाले. आरेप्रमाणे नाणार प्रकल्पात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांनीही बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेबाबत शंका उपस्थित केल्यामुळे लवकरच त्याबाबत निर्णय स्पष्ट होईल, राज्य सरकारचे पैसे जाणार असतील तर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. गृहमंत्रीपद शिवसेना की राष्ट्रवादी आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा याबाबत सर्वस्वी उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून मतभेद किंवा भांडणे नसल्याचा दावा राऊत यांनी केला.
click and follow Indiaherald WhatsApp channel