पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात मुळशी तालुक्यातील डोंगरगाव मधील जमिनीची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विक्री करुन 14 जणांची फसवणूक केल्याचा गोखलेंवर आरोप आहे. 

 

विक्रम गोखले यांच्यासह तिघांनी 96 लाख 99 हजार रुपयांना फसवणूक केल्याची तक्रार जयंत प्रभाकर बहिरट यांनी दिली होती. त्यानुसार अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले, जयंत रामभाऊ म्हाळगी, सुजाता जयंत म्हाळगी यांच्यावर पुण्यातील पौड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी यांनी 25 वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे ‘गिरीवन प्रोजेक्ट’चे अध्यक्ष आहेत. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करुन त्यांनी खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित केल्याचा आरोप आहे.

 

विना हरकत मोजण्या करुन घेण्याचा आदेश असताना संचालक वेळोवेळी हरकत घेत होते. प्लॉटधारकांनी मोजणी करुन घेतल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच, गिरीवन प्रोजेक्ट हा प्रायव्हेट हिल स्टेशन असल्याचं सांगून फसवल्याचा दावाही फिर्यादीनी केला आहे.

 

तक्रारदार असलेल्या 14 जणांना जाणूनबुजून चुकीच्या गटात खरेदीखत देणे, खरेदीखतात दिलेल्या गटापेक्षा जवळ जवळ दीड किमी लांब पझेशन देणे, खरेदी खतात दिलेला गट आणि पझेशन दिलेला गट सारखा नसणे, काहींना आजपर्यंत पझेशन घेऊ न देणे, पैसे घेऊन खरेदीखताप्रमाणे क्षेत्र न देणे, खरेदी केलेल्या प्लॉटवर जाऊ न देणे, अशा विविध प्रकारे या प्लॉटधारकांची फसवणूक केली आहे.

 

प्लॉटधारकांची एकूण 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचा दावा केला आहे. या सर्वांवर 420, 465, 468, 341, 447, 427, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम गोखले हे मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत मानाने घेतले जाणारे नाव आहे. गोखले यांनी शेकडो मराठी हिंदी मालिका, चित्रपट, नाटकं यांमध्ये भूमिका केल्या आहेत. जावई माझा भला, कथा अशी नाटकं, कळत नकळत, मुक्ता, नटसम्राट, अग्निपथ, हम दिल दे चुके सनम, मिशन मंगल असे चित्रपट, या सुखांनो या अशा मालिकामध्ये त्यांचा अभिनय गाजला आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: