पुणे : पुणे : बारामतीत मागील काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसह बारामती पॅटर्न राबवला जात आहे. त्यामध्ये नागरिक चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (19 एप्रिल) बारामतीत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

 

यावेळी त्यांनी बारामतीत तातडीने कोरोना प्रयोग शाळा सुरु करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच कोरोनाची साखळी तोडायची असेल तर प्रशासनाला सहकार्य केलंच पाहिजे, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

 

बैठकीत अजित पवार यांनी शहरात आणि तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बारामती पॅटर्नचाही आढावा घेतला. नागरिकांना अत्यावश्यक सेवा देतानाच चिकन, अंडी, मटण आणि बेकरी उत्पादनेही नागरिकांना घरपोच द्यावीत. नागरीकांनी कोणत्याही परिस्थितीत घरातून बाहेर पडू नये यासाठी अधिक दक्ष राहा, अशा सूचनाही यावेळी अजित पवार यांनी दिल्या.

 

बारामतीत संशयित रुग्णांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करा. खासगी डॉक्टरांनी या संकटकाळात सहकार्य करावं, अत्यावश्यक वस्तूंची चढ्या भावात विक्री होणार नाही याकडे लक्ष द्यावं.

 

तसेच बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळेसह रुई ग्रामीण रुग्णालयात 50 खाटांच्या कोरोना हेल्थ केअर सेंटरची उभारणी करा, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या.


दरम्यान, देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 3 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 201 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 331 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: