पुणे : एसआरए योजनेच्या जाचक अटीमुळे अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राखडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियमावलीतील जाचक अटी रद्द करून ती सुलभ केल्याने झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचेच भिमाले संकुल हा पुनर्वसन प्रकल्प एक उत्तम उदाहरण असल्याच्या भावना खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केल्या.
महात्मा फुले पेठेतील पिंपळ मळा येथील एसआरए प्रकल्पातील सुमारे 239 सदनिकाचे वाटप खासदार बापट यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांच्यासह, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक आणि भाजपचे नगरसेवक या वेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एसआरए योजना रखडल्या आहेत. या योजनेतील जाचक नियमांमुळे ही स्थिती उद्भवली होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही नियमावली सुटसुटीत केल्याने प्रत्येक झोपडीधारकला हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शिवाय केंद्र व राज्यशानाच्या माध्यमातून महापालिका पंतप्रधान आवास योजना राबवित असून 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे हा याचा मुख्य उद्देश असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.
गेल्या अडीच वर्षापासून या योजनेचे काम सुरू होते. या माध्यमातून सर्वसामान्यांना हक्काचे घर देताना विशेष आनंद होत असल्याच्या भावना सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच भविष्यातही महापालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुणेकरांना घरे मिळवित यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.
click and follow Indiaherald WhatsApp channel