राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते नांदेडमध्ये दाखल झाले. शरद पवारांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत करताना विविध मुद्द्यांना स्पर्श केला. महापुरादरम्यान राज्यकर्त्यांनी कोल्हापूर- सांगलीत लोकांमध्ये मिसळून त्यांना विश्वास द्यायला हवा होता, पण ते घडलं नाही. सत्ताधारी नेत्यांबाबत लोकांमध्ये नाराजी आहे, असं पवार म्हणाले.

आता जे देशात घडतंय ते योग्य नाही. सीबीआय, ईडी अशा सरकारी यंत्रणा या गुन्हेगारांसाठी होत्या, मात्र सत्तेचा गैरवापर करत पक्षांतर घडवल्या जातोय, याबद्दल लोकांमध्ये राग आहे, असा घणाघात पवारांनी केला. गेली पाच वर्षे देशात कुणाचं राज्य होतं? उदयनराजे यांची कामे कुणी रोखली? विरोधीपक्षात राहूनही लोकांची कामे करता येतात. असं म्हणत त्यांनी उदयनराजेंच्या आरोपांना उत्तर दिलं.

बारामती जिल्हा करण्यास माझा कधीच पाठिंबा नव्हता. मी आता निवडणुकीला उभे राहणार नाही, आता नेतृत्व तयार करण्याचं माझं काम आहे. मात्र राज्यकर्ते माझ्यावर टीका करतात, याचा अर्थ आमचं बर चाललंय, असं पवार म्हणाले.

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, तर काही लोकांना घाबरवत पक्षांतर करायला भाग पाडले, असा आरोप त्यांनी केला.

“उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. प्रदेशाध्यक्षाने उमेदवार जाहीर करायला हवे होते. पण लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार काल जाहीर केले. मात्र हे उमेदवार मी घोषित न करता प्रदेशाध्यक्षांनी करायला हवे होते, असं पवार म्हणाले.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: