काही जण चुकीच्या मार्गावर जातील असे वाटले नव्हते. पण त्यांनी पळपुटेपणा स्वीकारला. अशांचा लोकच आता समाचार घेतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी नवी मुंबईतील मेळाव्यात दिला.
‘मी १९६७ मध्ये प्रथम विधिमंडळात गेलो. तेव्हापासून आजपर्यंत ५३ वर्षे कोणत्या ना कोणत्या सदनात आहे. २७ वर्षे मी विरोधी पक्षात होतो. मला विरोधी पक्षात राहूनही काम करताना काहीच अडचण आली नाही,’ असे पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जे याला कारणीभूत आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे योग्य नाही. राज्यात रोजागार संपवण्याचे काम काहींनी केले. त्यांच्याशी संघर्ष करायचा सोडून काही जण त्यांच्या पदराआड लपत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांवर केली.
कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर आला. शेतीचे, घरादारांचे मोठे नुकसान झाले. तिथल्या बांधवांना मदत करायची सोडून काही जण महाजनादेश यात्रा काढण्यात मग्न आहेत, अशी टीका त्यांनी सत्ताधारी भाजपवर केली. पूरग्रस्तांना मुख्यमंत्री एकदा भेटून आले.
त्यानंतर त्यांनी त्या भागाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुख्यमंत्री केवळ विरोधकांवर तोंडसुख घेतात. तुम्ही पाच वर्षांत काय काम केले सांगा. विरोधकांवर टीका करता म्हणजे तुमच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
click and follow Indiaherald WhatsApp channel