नांदेड : ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये चाललेल्या नांदेड जिल्ह्यात 17 मे पर्यंत लॉक डाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दोन-तीन दिवसात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे.
काही दिवसात परिस्थिती सुधारली तर आढावा घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने अंशत: शिथिल केलेल्या सवलतींचा लाभ नांदेड जिल्ह्याला सध्यातरी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. तसेच नांदेडमध्ये वाईन शॉपही बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधी 3 मे हून 17 मेपर्यंत वाढवला असला तरी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्हे व महानगरांत काही प्रमाणात दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. रेड झोनमधील बाधितांचे क्षेत्र नसलेल्या भागात देखील काही प्रमाणात लहान दुकाने सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली.
त्याचप्रमाणे सकाळी 10 ते सायंकाळी 6 अशी वेळ निर्धारित करून सीलबंद दारू विक्रीची दुकाने देखील सुरू करण्यास हिरवा झेंडा दाखवला. अर्थात शारीरिक सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अटी लादल्या असल्या तरी नांदेडमद्धे मात्र जिल्हाधिकारी यांनी दारूची दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात केलेल्या वर्गवारीत नांदेड जिल्हा ग्रीन झोनमधून ऑरेंज झोन मध्ये गेला. कोरोनाचा शिरकाव होऊन धोका वाढला तरी नवीन वर्गवारी होईपर्यंत जिल्ह्यातील काही व्यवहार सुरू होतील. लोकांना घराबाहेर पडण्यास थोडी उसंत मिळेलसअसे वाटत होते. परंतु ही अपेक्षा फोल ठरली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवारी रात्री जारी केलेल्या आदेशानुसार लॉकडाऊनसाठी पूर्वी जारी केलेले आदेश कायम ठेवण्यात आले आहे. यामुळे भाजीपाला व फळ विक्री सकाळी 7 ते 11 आणि दूध, किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 याच वेळेत सुरक्षित अंतर व अन्य नियमांचे पालन करून सुरू ठेवता येणार आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel