कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस. ते आज 87 वर्षांचे झाले. 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारताच्या पंजाब गावात त्यांचा जन्म झाला. दरम्यान, त्यांच्या वाढदिवसासाठी राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मनमोहन सिंग हे राजस्थानमधील राज्यसभेचे सदस्य आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंग यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्‌विट करून मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या. आमचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग जी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे त्यांनी ट्‌विट केले आहे. मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो असेही त्यांनी ट्‌विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

1948 मध्ये मनमोहनसिंग यांनी पंजाब विद्यापीठातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी 1957 साली ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून इयॉनॉमिक्‍समध्ये प्रथम श्रेणीमधून पदवी प्राप्त केली. 1962 मध्ये त्यांनी ऑक्‍सफोर्ड विद्यापीठातील नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली.

पीएचडी आणि डॉक्‍टरेट घेतल्यानंतर मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये अर्थशास्त्र शिकवले.  जिनिव्हा येथे दक्षिण आयोगाचे सरचिटणीस म्हणून त्यांचीही नेमणूक झाली. 1971 मध्ये डॉ. सिंग हे वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार आणि 1972 मध्ये अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार होते.

त्यानंतरच्या काही वर्षांत ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष (यूजीसी) देखील होते. तसेच मोदी सरकारच्या अगोदर मनमोहन सिंग हे दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: