बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणली. मात्र विरोधी सहकार बचाव पॅनलला हा निर्णय मान्य नाही. राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर करुन पैसा आणि दहशतीच्या बळावर निवडणूक जिंकल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला. “त्याचबरोबर अजित पवारांनी घेतलेल्या गोपनीय शपथेचा भंग केला. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली. या निवडणुकीत 50 कोटी वाटप झाले” असा आरोप रंजन तावरे यांनी केला.

 

“राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत सत्तेचा प्रचंड गैरवापर केला. कारखान्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निवडणूक लादली. या निवडणुकीत प्रचंड पैशाचा,  सत्तेचा गैरवापर, दमदाटी आणि दहशत केली” असे गंभीर आरोप रंजन तावरे यांनी केले.

 

“राज्याचे उपमुख्यमंत्री दीड लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतात. मात्र कारखान्यासाठी तब्बल सहा दिवस उपमुख्यमंत्री बारामतीत ठाण मांडून होते. त्यांनी मतदारांना दमदाटी केली. कोणाला नोकरीवरून काढू, कोणाचं पाणी बंद करू, अशा धमक्या दिल्या”, असाही आरोप तावरे यांनी केले.

 

“सत्तेच्या माध्यमातून नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याच्या मुद्द्याचा निवडणुकीत वापर केला. त्याचबरोबर मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रुमचा परिसर नॉन मॅन झोन असताना, चार संशयित लोक आढळून आले. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही असा दावा तावरे यांनी केला. या संशयित व्यक्तींना 12 तासांपेक्षा जास्त काळ मिळाला आहे.  त्यामुळे संशयाची सुई निश्चित असून, गडबड घोटाळा झाल्याचा संशय आहे”, असंही रंजन तावरे म्हणाले.

 

“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गोपनीयतेची शपथ घेतली आहे, मात्र त्या शपथेचा त्यांनी भंग केला.  शपथ घेताना आकसाने वागणार नसल्याचं म्हटलं जातं. मात्र अजित पवारांनी सत्तेच्या माध्यमातून मतदारांच्या प्रपंचात माती कालावली” असा घणाघात रंजन तावरे यांनी केली.

 

“या निवडणुकीत मतदारांना मागेल तेवढे पैसे वाटले. राज्यात आम्ही ऊसाला सर्वाधिक भाव दिला आहे. त्यामुळं अजित पवारांना स्वतःच्या खासगी कारखान्याला जास्त भाव द्यावा लागत होता.  पाच वर्षात त्यांना 600 कोटी पेक्षा जास्त तोटा येत होता. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत 50 कोटी वाटल्याने काय फरक पडणार, असा विचार केल्याचा” आरोप रंजन तावरे यांनी केला.

 

“कारखान्याच्या निवडणुकीत चार दिवसांपासून पैशाचं वाटप सुरु होतं. एवढ्या मोठ्या उंचीवर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी घराघरात जाऊन दहशत निर्माण करणं हे पदांना शोभणारा नव्हतं. त्याचबरोबर माझ्यावरती खोट्यानाट्या केसेस करून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोर्टाने मला न्याय दिल्याने मी निवडणूक लढवू शकल्याचं” रंजन तावरे यांनी म्हटलंय.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: