पोर्ट ऑफ स्पेन : मागच्या काही वर्षांमध्ये टीम इंडियाची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. पण वनडेमध्ये चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूची समस्या काही सुटायचं नाव घेत नाहीये. युवराज सिंगनंतर टीम इंडियाने अनेक जणांना चौथ्या क्रमांकावर संधी दिली, पण कोणत्याच खेळाडूला या संधीचं सोनं करता आलं नाही.

मागच्या चार ते पाच वर्षांपासून चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन टीम इंडियासाठी समस्या राहिली आहे. २०१५ वर्ल्ड कपमध्ये अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळला. यानंतर टीमने चौथ्या क्रमांकावर अनेक खेळाडूंना संधी दिली, पण त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने १० मॅच खेळल्या यामध्ये चौथ्या क्रमांकावर ४ बॅट्समनना संधी देण्यात आली.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने सुरुवातीला केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवलं. पण शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे राहुलला ओपनिंगला खेळावं लागलं. राहुलच्याऐवजी विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळला. पण विजय शंकरही अपयशी ठरला. वर्ल्ड कपच्या दोन मॅचमध्ये हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर आला, तर उरलेल्या ४ मॅचमध्ये ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं.

विराटचं स्पष्टीकरण

चौथ्या क्रमांकाची डोकेदुखी ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीने आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळेल. चौथा आणि पाचवा क्रमांकाचा बॅट्समन आमच्यासाठी लवचिक आहे. मॅचमधल्या परिस्थितीनुसार कोणीही कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतं. माझ्यामते चौथ्या-पाचव्या क्रमांकाचे नाहीत, तक सुरुवातीचे ३ बॅट्समन आणि सहाव्या-सातव्या क्रमांकाचे बॅट्समन स्पेशलिस्ट पाहिजेत. मागच्या काही दिवसांपासून यावर वादविवाद सुरु आहेत, पण वनडे आणि टी-२० मध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूमध्ये लवचिकता पाहिजे,' असं विराट म्हणाला.

झी24तास


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: