नवी दिल्ली : जगभरासमोर सध्या कोरोनाचे भलेमोठे संकट आ वासून उभे आहे. दरम्यान देशभरात लॉकडाउन आहे. यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक गुरुवारी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. या वेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.


सोनिया गांधी म्हणाल्या की, 21 दिवसांचे लॉकडाउन आवश्यक होते. मात्र हे अनियोजित पध्दतीने लागू करण्यात आले आहे. या लॉकडाउनमुळे देशभरातील अनेक मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


सोनिया गांधी म्हणाल्या की सरकारने डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचार्‍यांना वैयक्तिक संरक्षक उपकरणे उपलब्ध करुन दिली पाहिजेत. शासनाने नियुक्त केलेल्या रुग्णालयांची माहिती, बेडची संख्या, क्वारन्टाइन व चाचणी सुविधा व वैद्यकीय पुरवठा याची माहिती प्रसिद्ध करावी. कापणीसाठी असलेली शेतकऱ्यांवरील बंदी हटवावी.


सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला मध्यमवर्गासाठी एक किमान मदत कार्यक्रम तयार करुन प्रकाशित करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेस सरकार, फ्रंटल संघटना, नेते आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ज्या कुटुंबांना जास्त धोका आहे अशा कुटुंबांना त्यांची मदत द्यावी.


मजुरांच्या पलायनावर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आम्ही दोन महिन्यांपासून कोरोनावर लक्ष ठेवून आहोत. याविषयी आम्ही विशेषज्ञांसोबतही बातचित करत आहोत. जगात असा कोणताही देश नाही जो मजूरांच्या व्यवस्था करण्यापूर्वीच लॉकडाउनची घोषणा केली.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: