नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असून याबाबत आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या महामारीमुळे संसर्ग झालेल्या रूग्णांची देशातील आतापर्यंत संख्या 11 हजार पार पोहोचली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 हजार 439 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर 377 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1306 लोक आतापर्यंत उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रामध्ये 178, मध्यप्रदेशमध्ये 50, गुजरातमध्ये 28, पंजाबमध्ये 12, दिल्लीमध्ये 30, तामिळनाडूमध्ये 12, तेलंगणामध्ये 17, आंध्रप्रदेशमध्ये 9, कर्नाटकात 10, पश्चिम बंगालमध्ये 7, जम्मू-काश्मिरमध्ये 4, उत्तर प्रदेशमध्ये 5, हरियाणामध्ये 3, राजस्थानमध्ये 3, केरळमध्ये 3, झारखंडमध्ये 2, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. मोदींनी लॉकडाऊन 1 च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी देशाला उद्देशून भाषण केले. त्यांनी यावेळी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 25 मिनिटांच्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे कठोर पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात येणार आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel