
करी रोड ब्रिज धोकादायक झाला आहे. दुरुस्तीसाठी हा ब्रिज बंद झाल्यास केईएम, गांधी तसेच टाटा रुग्णालयात वेळेत पोहचणेही कठीण होईल. त्यामुळे लोअर परळ पुलाचे काम सुरू होईल तेव्हा सेंट्रल रेल्वे ट्रॅकवरून लोअर परळ पश्चिम ते लालबाग आंबेडकर रोड यांना जोडणारा रस्ता तयार करावा. यामुळे भविष्यात होणारा ट्रफिकचा प्रश्न सुटेल अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केली.
लोअर परळ पश्चिम ते लालबाग आंबेडकर रोड यांना जोडणारा रस्ता तयार झाल्यास येथील ट्रफिकची मोठी समस्या सुटणार असल्याची बाब सुनील शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्याचप्रमाणे सध्या लोअर परळ पुलामुळे होणाऱया वाहतूककोंडीचा प्रश्नही त्यांनी मांडला. सुनील शिंदे म्हणाले, लोअर परळ पूल तोडल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर ट्रफिकची समस्या वाढली आहे.
महापालिकेच्या इंजिनीअरिंग हबचा मार्ग खुला करा
वरळी येथील ई मोजेस रोडवरील मुंबई महापालिकेच्या इंजिनीअरिंग ‘हब’मधून जाणारा महापालिकेचा खासगी रस्ता आहे. त्या रस्त्याने ऍनिबेझंट रोड व सी लिंक येथे लवकरच पोहचता येते. या रस्त्याने हलकी वाहने वळवल्यास वरळी नाका येथील ट्रफिकचा भार हलका होईल. त्यामुळे हा रस्ता जनतेसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केली.
कळवा खाडीवरील रेल्वे उड्डाणपुलाला जोडपूल बांधण्यासाठी चाचपणी
ठाणे-बेलापूर महामार्गावर कळवा खाडीवरील काम सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला शाखापूल (आर्मब्रिज) बांधण्याबाबतची व्यवहार्यता तपासून पाहण्यात येईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. यावर अधिक माहिती देताना राज्यमंत्री योगेश सागर म्हणाले की, विटावा रेल्वेपुलाखालील बोगद्याची पातळी लगतच्या खाडीच्या भरतीप्रसंगीच्या पाणी पातळीपेक्षा कमी असल्याने बोगद्यामध्ये पाणी येते ही वस्तुस्थिती आहे. हे पाणी उपसण्यासाठी तेथे पंप बसविण्यात आलेले आहेत. पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा येतो. कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक असल्यामुळे 2010 मध्ये बंद करण्यात आला आहे. सध्या 1996-96 मध्ये बांधलेल्या पुलावरून वाहतूक सुरू आहे.