मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करताना अर्थचक्र सुरु राहावे यासाठी रेडझोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली आहे. आजघडीला ७० हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून ५० हजार उद्योग सुरुही झाले आहेत. ५ लाख कामगार काम करत आहेत.
हे चक्र अधिक गतिमान करताना महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नव्याने भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. याचाच एक भाग म्हणून ४० हजार एकर जमीन उद्योगासाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्याचा लाभ घेऊन परदेशी उद्योजकांनी पुढे यावे, हरित उद्योग सुरु करावेत, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
कोणत्याही अटी आणि शर्थीशिवाय राज्यात उद्योग सुरु करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक उद्योजकांना साद घालताना महाराष्ट्र उभा करण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढे यावे आणि उद्योग संधींचा लाभ घ्यावा, हा महाराष्ट्र शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे हे दाखवून द्यावे असे आवाहन केले.
आपल्यासमोर दोन आव्हाने असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपल्याला आपले ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिथे एकही रुग्ण निर्माण होऊ द्यायचा नाही तर दुसरे आव्हान आहे रेड झोनचे ग्रीन झोन मध्ये रुपांतर करणे.
हे ही आव्हान आपल्याला स्वीकारायचे आहे. ग्रीन झोन मध्ये उद्योग सुरु करतांना जमीन घेण्यासाठी पैसे नसतील तर भाडेतत्वावर जमीन उपलब्ध करून देतांना सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांची ही उपलब्धता करून दिली जाईल.
click and follow Indiaherald WhatsApp channel