मुंबईनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ’मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. तासभराच्या चर्चेनंतर ही बैठक संपली. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आक्रमक दिसून आले. या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे 55 विजयी उमेदवार उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला हवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा अधिकृत प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा, ज्यामध्ये ठरल्याप्रमाणे सत्तेचे समसमान वाटप असेल. त्यानंतरच सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना चर्चा करेल, असा आक्रमक पवित्रा सेना आमदारांनी घेतला आहे. शिवसेना आमदारांनी गटनेता आणि मुख्यमंत्रिपदासाठी सर्व अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवेअमित शाह-उद्धवजींची चर्चा त्यांनाच माहीत. आम्ही बोलणं योग्य नाही. दोन्ही नेते एकत्र बसून योग्य त्या पद्धतीने विषय संपवतील. त्यांनी म्हणणं मांडलं पण ते दबाव टाकतील असं नाही. राजकारणात लहान भाऊ, मोठा भाऊ संख्येवर ठरत असतो. ज्याची संख्या लहान तो छोटा आणि संख्या मोठी तो मोठा. आम्ही कुणाला लहान मोठा समजत नाही. सेना-भाजप समान आहोत. अधिकृतरित्या दोघेही बोलत नाहीत, तोपर्यंत आम्ही बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी दिली.
’जायंट किलर’ आमदारांचे विशेष कौतूकअत्यंत प्रतिकूल परीस्थितीत पहिल्यांदा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवणार्‍या ’जायंट किलर’ आमदारांचे मातोश्रीवर विशेष कौतूक करण्यात आले. त्यात यामीनी जाधव (भायखळा), दिलीप लांडे (चांदिवली) आणि महेश शिंदे (कोरेगाव) यांचा समावेश आहे. यामीनी जाधव आणि दिलीप लांडे यांनी मुस्लिम बहूल मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे तर महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या सातारा कोरेगाव मतदारसंघात 4 वेळा आमदार राहिलेले शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे.

दरम्यान, आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही आमदार म्हणून विधिमंडळात उपस्थित असणार आहेत. तसेच त्यांनाच शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचीही गटनेतेपदी नियुक्ती होऊ शकते. आणि तसे झाले तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असतील. शिवसेनेच्या बैठकीत यासंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख नव्या आमदारांसोबत काय निर्णय घेतायेत याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: