भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. तसेच मागील महिन्यात पार पडलेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली नव्हती.
याबद्दल कुलदीपने म्हटले आहे की निवड न झाल्याची चिंता वाटत नाही. या संधीचा उपयोग भारत अ संघाकडून खेळत कसोटी क्रिकेटसाठीचे गोलंदाजी कौशल्य आणखी चांगल्याप्रकारे आत्मसात करण्यासाठी होऊ शकतो.
द हिंदू आणि डेक्कन हेराल्डशी बोलताना कुलदीप म्हणाला, ‘मी मागील दोन टी20 मालिकेत निवड न झाल्याची चिंता करत नाही. कदाचित निवड समीतीला वाटले असेल की मला विश्रांतीची गरज आहे. कदाचित संघाला वाटत असेल की काही बदल करण्याची गरज आहे.’
‘मी या निर्णयाचा सन्मान करतो. माझी याबद्दल कोणतीही तक्रार नाही. मी कसोटीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ही संधी असल्याचा विचार करत आहे.’
कुलदीप कसोटीत भारताचा फिरकी गोलंदाजीसाठी रविंद्र जडेजा आणि आर अश्विननंतरची तिसरी पंसती असण्याची शक्यता आहे. कसोटीमध्ये खेळण्याबद्दल कुलदीप म्हणाला, ‘जेव्हा तूम्ही सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत नसता त्यावेळी या क्रिकेट प्रकारामध्ये खेळणे कठिण आहे.’
‘जर तूम्ही कसोटी क्रिकेट प्रकारात नियमित नसाल तर तूम्हाला लयीत येण्यासाठी वेळ लागतो. जेव्हा तूम्ही सातत्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळता आणि अचानक तूम्हाला जास्त तयारी न करता कसोटी क्रिकेट खेळावे लागते तेव्हा खेळणे अत्यंत कठिण होते.’
‘तूम्हाला अनेक षटके सलग गोलंदाजी करावी लागते. सराव सामने खेळावे लागतात. मैदानावरील क्षेत्ररक्षण समजून घ्यावे लागते आणि विकेट कशी मिळवायची हे समजून घ्यावे लागते. माझ्यासाठी इथे येऊन शक्य तेवढे षटके गोलंदाजी करायला मिळणे महत्त्वाचे आहे. अजून खूप काम करायचे आहे.’
click and follow Indiaherald WhatsApp channel