मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी आज पत्रकार परिषद घेत भीमा कोरेगाव तपासाबाबत भाष्य केलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली.

 

शरद पवार म्हणाले, “भीमा कोरेगाव-एल्गार याबाबत मी माझी मतं व्यक्त केली. यामध्ये एक बाब आहे की कोरेगाव-भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. कोरेगाव भीमा, एल्गार संदर्भात चर्चा होतेय. त्यात उलटसुलट चर्चा होत आहे. कोरेगाव भीमा हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्तंभाला अभिवादन त्या ठिकाणी केले जाते”.

 

दरवर्षी लोक जमतात आणि विजय स्तंभाला अभिवादन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आल्यानंतर तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढली. संभाजी भिडे यांनी त्या ठिकाणी एक वेगळे वातावरण निर्माण केलं गेलं. त्यात नक्की काय झालं ते चौकशीत बाहेर येईल, असं शरद पवार म्हणाले.

 

एल्गार परिषद ही वेगळी आहे. कोरेगाव भीमाशी तिचा संबंध नव्हता. एल्गार परिषद त्याच्या काही दिवस आधी झाली होती. शंभरपेक्षा जास्त संघटना परिषदेत सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षपद नि. न्यायमूर्ती पी बी सावंत करणार होते. परंतु ते येऊ शकले नाहीत.

 

एल्गार परिषदेशी संबंध नसलेल्या, हजर नसलेल्या लोकांवर खटले भरले गेले. नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा हा प्रसिद्ध काव्यसंग्रह, त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार. त्यातील एक कविता अत्याचाराविरुद्ध भावना व्यक्त करते. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय-बहीण आजही विटंबली जाते’ ही कविता वाचल्याने सुधीर ढवळेंवर कारवाई केली, असं शरद पवार म्हणाले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: