पुणे – पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीबाबत उमेदवारांकडून तक्रारी दाखल झाल्या होत्या. उमेदवारांच्या शंकांचे निरसण करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी फेसबुक लाइव्हवरुन उमेदवारांशी संवाद साधला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याने उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात आठ वर्षानंतर शिक्षक भरती होत आहे. पवित्र पोर्टलमार्फत 12 हजार रिक्त जागांसाठी भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील 5,822 उमेदवारांची निवड यादी जाहीरही करण्यात आली आहे. दरम्यान, निवड यादीत स्थान मिळालेल्या सुमारे 2,500 उमेदवारांनी “आम्हाला पात्र असतानाही डावलण्यात आल्याने अन्याय झाला आहे,’ असे म्हणत तक्रार अर्ज दाखल केले आहेत. माजी सैनिक, महिला, भूकंप, प्रकल्पग्रस्त, खेळाडू व इतर समांतर आरक्षणात संधी मिळाली नसल्याने उमेदवारांकडून संतापही व्यक्त करण्यात येऊ लागला आहे.

शिक्षण आयुक्तांनी उमेदवारांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्या सोडविण्यासाठी त्यांनी शालेय शिक्षणमंत्री ऍड.आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार उमेदवारांशी मंगळवारी संवाद साधला. सुमारे एक तासभर त्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे, एनआयसीचे तांत्रिक संचालक मोझे, अभिषेक सावरीकर आदी उपस्थित होते.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: