भाजपने पुण्यातील कोथरूड येथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस, मनसे आणि स्वाभिमान शेतकरी संघटना या पक्षांनी त्यांचा दारुण पराभव करण्यासाठी मोट बांधली आहे. सर्व पक्षांचा मिळून एकच उमेदवार पाटील यांच्या विरोधात देण्यात येणार आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाणार आहे.
कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरूड येथे भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक विविध संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. तर चंद्रकांत पाटील यांना पाडण्यासाठी कोथरूड या मतदार संघात असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्या ताकदीचा उमेदवार देण्यासाठी दोन्ही बाजूंनी नावे समोर आणले आहेत.
त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांना कोथरूड येथून उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. चौधरी यांना कोथरूड येथे उमेदवारी दिल्यास येथील मोठा वर्ग त्यांच्या बाजूने उभा राहील, असा अंदाज महाआघाडीतील नेत्यांनी बांधला आहे. तर दुसरीकडे मनसेकडून एका तगड्या उमेदवाराचे नाव काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीतील प्रमुख नेत्यांना सांगण्यात आले असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसे आपला उमेदवार उभा करून आपली ताकद आजमावण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही कोथरूड येथे ब्राह्मण समाजाचा एक उमेदवार पाहून ठेवला आहे. ऐनवेळी महाआघाडीतील इतर पक्षाशी विचारणा करून तो उमेदवार देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. यामुळे कोथरूड येथे उभे राहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना महाआघाडी आणि मनसेचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel