काल(17 जानेवारी) दुसर्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत केले . या सामन्यात भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या वनडे कारकीर्दीतील 100 वे विकेट घेत एक खास विक्रम केला आहे .
वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा कुलदीप यादव भारताचा 22वा गोलंदाज बनला आहे. त्याने कारकिर्दीतील 58व्या वनडे सामन्यात खेळताना हा पराक्रम केला. त्यामुळे तो भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. शमीने केवळ 56 सामन्यात हा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह दुसर्या क्रमांकावर आहे. बुमराहने 57 वनडे सामन्यात 100 विकेट घेतले आहेत.
त्याचबरोबर कुलदीप जलद 100 वनडे विकेट्स घेणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फिरकीपटू देखील ठरला आहे. त्याने जलद 100 वनडे विकेट्स घेणाऱ्या एकूण फिरकीपटूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिरची बरोबरी करताना ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नलाही मागे टाकले आहे.
वॉर्नने आपल्या वनडे कारकीर्दीतील 60 सामन्यात 100 वनडे विकेट्स घेण्याचा हा पराक्रम केला होता. या यादीत अफगाणिस्तानच्या राशिद खान अव्वल क्रमांकावर आहे तर पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सक्लेन मुश्ताक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राशिदने 44 सामन्यात तर मुश्ताक यांनी 53 सामन्यात हा पराक्रम केला.
#वनडे सामन्यात जलद 100 विकेट्स घेणारे फिरकीपटू –
44 सामने – रशिद खान- 100 विकेट
53 सामने- सक्लेन मुश्ताक- 100 विकेट
58 सामने- कुलदीप यादव- 100 विकेट
58 सामने – इम्रान ताहिर – 100 विकेट
60 सामने – शेन वाॅर्न- 100 विकेट
63 सामने- अंजिता मेंडिस- 100 विकेट
#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
56 सामने – मोहम्मद शमी
57 सामने – जसप्रीत बुमराह
58 सामने – कुलदीप यादव
59 सामने – इरफान पठाण
65 सामने – झहीर खान
67 सामने – अजीत अगरकर
68 सामने – जवागल श्रीनाथ
click and follow Indiaherald WhatsApp channel