मुंबई  : महाविकास आघाडी सरकारनं आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ पोकळ भाषण आहे अशा शब्दामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी फक्त भाषण केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारकडून करण्यात आलं आहे. तसेच अर्थसंकल्पातील घोषणा या केंद्राच्या भरवशावर असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे. 

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'अर्थमंत्र्यांच्या नावाखाली अर्थमंत्र्यांचं जाहीर सभेतील भाषण आम्ही ऐकले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वल पोकळ भाषण होते. त्याशिवाय यामध्ये काहीच नव्हते. अर्थ संकल्पात जे असायला हवे तेच यामध्ये नव्हते. कोणतीही आकडेवारी यामध्ये नव्हती. आर्थिक स्थितीबाबत कुठलंही विश्लेषण नव्हते. मागील वर्षाचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स या अर्थसंकल्पात नव्हता. ज्यासाठी आर्थसंकल्प मांडतात, तेच यात नव्हते असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

 

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पाविषयी बोलताना पुढे म्हणाले की,' अर्थमंत्र्यांना आणि या सरकारला, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विसर पडला आहे. कोकणाचे नाव घेण्यात आले. मात्र कोकणाच्या तोंडालाही पान पुसण्याचे काम केले आहे. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड हा 20 हजार कोटींचा प्रकल्प आहे. मात्र 200 कोटी देण्यात आलेले आहेत. कोकणातील वाहून जाणारे 168 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडयाला दुष्काळ मुक्त करायची आमची योजना होती. मात्र त्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही.

 

शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं
शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची काम या सरकारने केली आहेत. कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरीही मुदत कर्जासंबंधात कोणतीही नवीन घोषणा करण्यात आलेली नाही. दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. आम्ही दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारची घोषणा केली.

 

त्यावेळी आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र आता हीच घोषणा सरकारने केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन हेक्टरी 25 हजार, 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. सरकारला सत्तेच वचन लक्षात आहे पण शेतकऱ्यांना विसरले” अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

अर्थसंकल्पातील घोषणा या केंद्राच्या भरवशावर
देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पाविषयी म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या अनेक घोषणा केंद्र सरकारच्या भरवशावर करण्यात आल्या आहेत. दहा हजार गावांना पाणीपुरवठा ही केंद्राची योजना आहे. त्यासाठी केंद्र शंभर टक्के निधी देण्यात येणार आहे. पुणे रिंगरोडसाठी सर्व पैसा केंद्राचा, नितीन गडकरी देणार आहेत. मात्र या सरकारने केंद्र सरकारवर टीका करत नकारात्मक सुरुवातीवर धन्यता मानली असा आरोप फडणवीसांनी केला.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: