निलंगा  : लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण अभिप्रेत आहे. परंतु ७० वर्षानंतरही देशात सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे पाहायला मिळते. देशातील फक्त ५० प्रभावशाली कुटूंबांच्या हातामध्ये लोकशाही पाहायला मिळते ही  स्थिती म्हणजे लोकशाहीची फार मोठी शोकांतिका आहे अशी खंत जेष्ठ पञकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.

 

निलंगा येथे मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ-साविञी व्याख्यानमालेचे कांबळे तिसरे वक्ते होते, त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डाँ.व्ही.एल.एरंडे,तहसीलदार गणेश जाधव यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, लोकशाही ही माणसाची जीवनशैली आहे.या लोकशाहीमध्ये मतदार हा आत्मा असतो.ज्यावेळी लोकशाही घराण्यात,धर्मात व राजेशाही परंपरेत अडकते तिथे लोकशाहीची घुसमट होते. विरोधीपक्षाला लोकशाहीत अनन्यसाधारण महत्व आहे तर पाशवी बहुमत हे लोकशाहीसाठी मारक आहे.

 

लोकशाही ही बहुमतावर चालते.परंतु पाशवी बहुमत लोकशाहीचा गळा ओढतो.सक्षम विरोधीपक्ष असणे हे लोकशाही जिवंत असण्याचे लक्षण होय.सक्षम मतदार झाल्यास या मतदाराचे लोकशाहीवर नियंत्रण राहील. मतदार जागरुक झाल्यास आपल्याला अभिप्रेत असलेली लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास कांबळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.या कार्यक्रमाचे प्रास्तविक एम.एम.जाधव तर सूञसंचालन सतिश हानेगावे यांनी केले.                                                                       

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: