ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. ते कॅन्सर या आजाराने ग्रस्त होते. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कॅन्सरशी त्यांची झुंज सुरू होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली आहे.
प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. 'अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत लिहिले की, ते गेले, ऋषी कपूर गेले. आताच त्यांचे निधन झाले आहे. मी पूर्णपणे कोसळलो आहे.'
ऋषी कपूर यांना बुधवारी रात्री त्यांच्या कुटुंबीयांनी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी सांगितले की, त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.
29 एप्रिलला अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले. याच्या दुसऱ्या दिवशीच 30 एप्रिलला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडने एकापाठोपाठ एक दोन दिग्गज अभिनेत्यांना गमावले आहे. यामुळे फिल्म इंडस्ट्रीला हा मोठा धक्का आहे.
ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कला जगतावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर सेलेब्स आणि चाहते त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. हिंदी सिनेमांमध्ये ऋषी कपूर यांचे मोठे योगदान होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel