मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपने विश्वासघात केल्याचे म्हणत आहेत. पण कोणी कोणाचा विश्वासघात केला हे मध्यावधी निवडणूक झाली तर समजेल, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. त्यांनी शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवरही तीव्र शब्दांत टीका केली.

 

शिवसेनेला चंद्रकांत पाटील यांनी जोरदार चिमटा काढला. कोणी कोणाचा विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघात केला, हे लोकांना माहिती आहे. हे सरकार चालले नाही तर भाजप सरकार पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करणार नाही. अशावेळी मध्यावधी निवडणूक लागली तर कोणी विश्वासघात केला होता, याचे उत्तर जनताच देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.

 

दरम्यान, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण खटल्यावरूनही मुख्यमंत्री ठाकरे सरकारचे कान टोचले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती द्यायला नकार दिला, याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण राज्य सरकारने आजच्या सुनावणीवेळी काहीच तयारी केली नव्हती. तेव्हा राज्य सरकारने पुढील काळात पूर्ण ताकदीने हा खटला लढवावा. यामध्ये राजकारण आणू नये, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.                                         

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: