बारामती -“पूरप्रश्‍नी आम्हालाही राजकारण करायचे नाही, तरीही कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे वेळेत उघडले असते तर फुगवटा निर्माण न होता पाणी निघून गेले असते. आज महाराष्ट्राने तुमचे आमदार सांभाळले म्हणून तुम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्री झाला आहात याचा विसर पडू देऊ नका,’ असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना लगावला.      

बारामती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, “कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पुराचे संकट भयावह आहे. या भागाला संकटातून सावरण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. पुराच्या पाण्यात लोकांच सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी प्रत्येकाने सढळ हाताने मदत केली पाहिजे.’ “मी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन आलो आहे. आपण पाहतो किंवा वाचतो त्याहून परिस्थिती कितीतरी भीषण आहे. आपल्याच भागातील बांधवांवर आलेलं संकट शब्दांत सांगण्यापलीकडचं आहे. प्रत्येकाने शक्‍य होईल ती मदत करावी असे आवाहन पवार यांनी केले. राज्याच्या अनेक भागात ओढवलेले पुराचे संकट हे नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका आज लाखो लोकांना सहन करावा लागतो आहे,’ अशी घणाघाती टीका पवार यांनी केली.                                 



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: