मुंबई : भाजपशी फारकत घेऊन राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. याबाबत स्वतः शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचं म्हणत या भेटीच्या तपशिलात खोल शिरण्याची गरज नसल्याचंही राऊत म्हणाले.

 

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (21 फेब्रुवारी) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही. जय महाराष्ट्र.”

 

महाराष्ट्रात सत्तास्थापन करुन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते सर्वात आधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे या सदिच्छा भेटीमागील नेमकं कारण काय असा प्रश्न विचारला जात आहे.

 

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील 50-50 फॉर्म्युल्यावरुन शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांच्यावर विश्वासघात केल्याचा आणि खोटं बोलल्याचा गंभीर आरोपही केला होता.  यानंतर शिवसेनेकडून आणि भाजपकडून एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. यात भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावरही सडकून टीका करण्यात आली. तसेच सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याचीही टीका करण्यात आली. या सर्व टीकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. या भेटीत काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: