मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 73 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कुटुंब नियोजनावर भाष्य केले. पंतप्रधानांनी कुटुंब नियोजनावर मांडलेले विचार हे समान नागरी कायद्याच्या दृष्टीने तिसरे पाऊल आहे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. तसेच देशात आता समान नागरी कायदा कधी लागू करणार असा सवालही यावेळी त्यांनी केला.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशातील अनेक मुद्यांना हात घालत देशाला विकासाच्या मार्गावर घेवून जाणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्याच भाषणाचा आधार घेत आज शिवसेनेचे मुखपत्र असणारे सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारला काही सवाल करत सरकारच्या कार्यपद्धतीची स्तुती केली आहे. तिहेरी तलाकविरुद्ध कायदा केलात. कश्मीरमधील 370 कलम काढून फेकले. आता देशात समान नागरी कायदा कधी लागू करणार?
आम्हाला खात्री आहे आता तो दिवसही दूर नाही. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याच्या दृष्टीने तिसरे पाऊल कालच्या स्वातंत्र्य दिनी टाकले. पंतप्रधानांनी कुटुंबनियोजनाचा डंका लाल किल्ल्यावरून वाजवला आहे. लोकसंख्यावाढ हे देशापुढील आव्हान आहे व कुटुंबनियोजन ही देशभक्तीच आहे, असे ठासून सांगितल्याने मुसलमान समाजाने कुटुंबनियोजन त्यांच्या शरीयतला मान्य नसल्याची बांग ठोकू नये असे अग्रलेखात म्हटले आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel