आरे कॉलनीतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडून तिथे मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याच्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या निर्णयाला शिवसेनेने कडाडून विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज या संदर्भातील भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
‘मुंबईतील पर्यावरणाच्या बाबतीत कोणाचीही मनमानी आम्ही सहन करणार नाही,’ असे त्यांनी ठणकावून सांगितले.शिवसेना भवनात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य यांनी मेट्रोच्या कारशेडला विरोध करण्यामागची कारणमीमांसा सांगितली. तज्ज्ञांच्या मदतीने त्यांनी या वेळी ’आरे’तील जैवविधतेचे सादरीकरणही केले. ‘शिवसेनेचा मेट्रोला अजिबात विरोध नाही. फक्त ‘आरे’मध्ये होणार्या कारशेडला विरोध आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
कारशेडला विरोध करण्यामागे कुठलेही राजकारण नाही. एक मुंबईकर व पर्यावरणप्रेमी म्हणून मी ही भूमिका मांडत आहे. मुंबईसाठी मेट्रो आवश्यक आहे. त्यामुळेच मेट्रोच्या कामामुळे मुंबईकरांना त्रास होत असतानाही आम्ही संयमाची भूमिका घेतली. अनेक रस्त्यावर खड्डे पडले, काही वेळा झाडे तोडली गेली; मात्र पायाभूत सुविधांचा प्रश्न असल्याने शिवसेनेने विरोध केला नाही; मात्र ‘आरे’तील कारशेड हा विषय वेगळा आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘आरे’मध्ये कारशेड झाल्यामुळे काही नुकसान होणार नाही, हे जे मेट्रो प्रशासनाकडून सांगितले जात आहे, ते चुकीचे आहे. हा केवळ वृक्षतोडीशी संबंधित विषय नाही, तर संपूर्ण पर्यावरणसंस्थेचा व जैवविधतेचा प्रश्न आहे. मुंबईची ती गरज आहे,’ असे आदित्य म्हणाले.
‘आरे’ परिसरात कारशेड उभारणे सर्वाधिक सोयीचे आहे. ही कारशेड अन्यत्र हलवावी लागली, तर हा प्रकल्पच पूर्ण होऊ शकणार नाही’, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी म्हटले होते. त्याचाही आदित्य यांनी समाचार घेतला.
click and follow Indiaherald WhatsApp channel