नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने अवैध संपत्तीप्रकरणी कर्नाटकचे वरिष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांचा जामीन याआधी फेटाळण्यात आला होता.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी आज काही तासांपूर्वीच शिवकुमार यांची भेट घेतली होती. या भेटीविषयीची माहिती शिवकुमार यांचे बंधू आणि काँग्रेसचे आमदार डी. के. सुरेश यांनी दिली. शिवकुमार यांना सोनिया यांनी संपूर्ण पक्ष तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. हा गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय हेतू असून इतर नेत्यांनाही अशाच प्रकारे लक्ष्य केले जात आहे. यातून बाहेर पडण्याचा उपाय आम्हाला शोधावाच लागेल, असे सुरेश यांनी माध्यमांना सांगितले होते.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अवैध संपत्तीप्रकरणी शिवकुमार यांना ३ सप्टेंबरला अटक केली होती. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. काँग्रेससाठी शिवकुमार कर्नाटकातील महत्त्वाचे नेते आहेत. कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस युती सरकार सुरळीत चालू ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
click and follow Indiaherald WhatsApp channel