ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दरवर्षीप्रमाणे यावेळीही भगवान भक्तीगडावर म्हणजेच संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगावात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळी 8 ऑक्टोबरला भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असेल. 2014 लाही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अमित शाह यांनी भगवान गडावरील  दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी 2014 ला त्यांचा राजकीय वारसा सांभाळला. विधानसभेपूर्वी त्यांनी संघर्ष यात्रा काढत अनेक मतदारसंघ पिंजून काढले. भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात अमित शाहांच्या उपस्थितीत त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं होतं. पण नंतरच्या काळात भगवान गडावरील दसरा मेळाव्याची प्रथा खंडीत झाली.

गेल्या तीन वर्षांपासून दसरा मेळावा हा सावरगावात होत आहे. यावेळीही पंकजा मुंडेंनी समर्थकांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलंय. विधानसभा निवडणूक आणि त्यात पारंपरिक दसरा मेळावा यामुळे पंकजा मुंडेंनी शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे.

8 ऑक्टोबर रोजी हा दसरा मेळावा होत आहे. गावा-गावातून भगवान बाबांच्या प्रतिमा असलेली भगवी पताका घेऊन यावे, या पताका भगवानबाबांच्या स्मारकासमोर अमित शाह यांच्या हस्ते रोवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थकांकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो समर्थक येतात. त्यामुळे अमित शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीतील हा दसरा मेळावा अभूतपूर्व होण्याची तयारी सुरु झाली आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: