“कमळाबाईला वाकविण्याची धमक फक्‍त बाळासाहेबांच्या शिवसेनेत होती. आता उलटच होत आहे. आताच्या शिवसेनेमध्ये ती धमक उरलेली नाही. सध्या शिवसेना बॅकफूटवर आहे. राज्यात शिवसेना भाजपच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून या शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यावर हे सरकार काहीच बोलायला तयार नाही,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीतील काळेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात केली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.

पवार म्हणाले, “राज्यातील लघु उद्योग बंद पडत आहेत. कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. तरीही पोस्ट, बीएसएनएल या शासकीय कंपन्यांची काय दुरवस्था झाली आहे? नोकरी मिळत नाही, त्यांची चूल बंद पडत आहे. उज्वला गॅस योजनेची मोठी जाहिरात शासनाने केली. पण, गॅसची किंमत इतकी वाढवून ठेवली आहे की तो घरात आणता येत नाही.

पाच वर्षांत राज्यात किती नवीन कारखाने आले ते सरकारने जाहीर करावे? नाहीतर किती कारखाने बंद पडले ते आम्ही सांगतो. आत्ताही राज्यात जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. अतिवृष्टीत नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यांच्यासाठी या सरकारने काय केले? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

“भाजप सरकार फक्‍त जाहिरातबाजी करीत आहे. जर भ्रष्टाचार झालाच नाही, असे भाजपचे म्हणणे आहे तर मग यांच्याकडे इतका पैसा आला कोठून? तुमच्या पक्षाला कोट्यवधी रुपये मिळतात मग बाकीच्या पक्षांना एवढा निधी का मिळत नाही? याचे उत्तर कोणी देऊ शकत नाही. राज्यातील वाढत्या जातीय तणावामुळे पोलीस चिंतेत आहे.

फडणवीस सरकारच्या काळात हिंदू मुस्लिम तणावाची जागा सवर्ण अनुसूचित जातीने घेतली आहे. हे राज्याच्या हिताचे नाही. लोकसभा निवडणुकीत पुलवामा बालाकोट आणले आणि आता 370 फायदा घेण्याचा प्रयत्न ते करतील. भाजपला रोजगार उपलब्ध करता येत नाही, महागाई कमी करता येत नाही, शेतकऱ्यांना न्याय देता येत नाही.’

“त्यामुळे 370 सारखा मुद्दा काढायचा आणि त्याकडे नागरिकांचे लक्ष वेधायचे, असा भाजपचा डाव आहे. देशातील निवडणुकीच्या वेळी लोक वेगळा विचार करतात आणि विधानसभेला वेगळा विचार करतात; हे इतर राज्यांच्या निवडणुकीतून स्पष्ट झाल्याचेही पवार म्हणाले. पवार म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने खूप आश्‍वासने दिली होती.

त्यातील टोलमुक्‍त महाराष्ट्राचे काय झाले? शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देणार होते, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काय झाले, याबाबत शासन एक अक्षरही काढत नाही. विकासाला पैसे पाहिजेत, असे म्हणत कर वाढविले. आता मंदी दूर करण्यासाठी एक हजार 78 कोटींच्या सवलती दिल्या आहेत. यामुळे शासनाचा महसूल घटणार असून त्याचा थेट परिणाम विकास कामांवर होणार आहे,’अशीही टीका पवार यांनी केली.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: