मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवलेली असूनही लोक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

 

सावध व्हावे, गर्दी टाळावी असे आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे युद्ध आपण नक्की जिंकू असा विश्वास राज्यातील जनतेला दिला. थेट प्रसारणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

धोका आहे, काळजी घ्या, रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब
राज्यात चाचणी केंद्र वाढले आहेत, त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असले तरी अजून आपण काळजी घेतली तर विषाणूचा हल्ला परतवून लावू शकतो या स्थितीत आहोत. धोका आहे पण त्यामुळे घाबरून जाऊ नये, गर्दीही करू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या यादीत सुरुवातीला जे देश नव्हते, त्या देशातून जे नागरिक- पर्यटक आले, त्यांनी कोणतीही माहिती न लपवता पुढे यावे. लक्षणे आढळली तर पटकन उपचार करून घ्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो हेही या दरम्यान स्पष्ट झाल्याचे सांगितले.

थंड पेय, थंड सरबत यापासून दूर राहा
मुख्यमंत्र्यांनी खाजगी डॉक्टरांना दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन केले. सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे असलेले रुग्ण सरकारी दवाखान्यात पाठवा. परंतु इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्या, घाबरून जाऊ नका असेही सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वातानुकूलन यंत्रणा (एसी) न लावण्याची सूचना केली. तसेच थंड पाणी, थंडपेय, थंड सरबत यापासून थोड्या काळासाठी दूर राहा, ॲलर्जी टाळा, साधं पाणी प्या, यामुळे नेहमीच्या पद्धतीने होणारे सर्दी पडशासारखे आजार तुम्ही दूर ठेऊ शकाल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: