मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 7 मार्चला म्हणजेच उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असणार आहेत. शनिवारी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री रामलल्लांच दर्शन घेणार आहेत. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे रामाचा प्रसाद आहे. रामलल्लाच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.

 

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले की, फैजाबाद एअर स्ट्रीपमध्ये लँडिंगसाठी अडचण आहे. यामुळे लखनौ एअरपोर्टवर उद्धव ठाकरे यांचं विमान लँडिंग करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शरयू नदीवर महाआरती रद्द करण्यात आली आहे. शरयू नदीवर महाआरतीचं नियोजन होतं. मात्र जास्त गर्दी होईल, करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या राज्य आरोग्य विभागाने विनंती केल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

 

संजय राऊतांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत आल्यानंतर साडे तीन वाजता प्रसार माध्यमांशी संवात साधणार आहेत. यानंतर 4.30 वाजता ते रामलल्लांचे दर्शन घेतली. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते असतील. तसेच मंदिर उभारणीमध्येही शिवसेनेची सहभागी होण्याची इच्छा आहे. त्याविषयी मुख्यमंत्री माहिती देतील. त्यांच्या दौऱ्याला कोणाचाही विरोध नाही. मी सर्वांना भेटलो आहे. देशातील सर्वांनी रामलल्लाचे दर्शन घ्यावे अशी आमची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: