बीड : खासदार प्रीतम मुंडे यांनी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे आज असते, तर असं बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती, असं मत व्यक्त केलं. स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असंही प्रीतम मुंडे यांनी नमूद केलं.

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “पंकजा मुंडेंनी बीडच्या विकासासाठी काम केलं ही त्यांची चूक झाली का? ऐकवत नाही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्याविषयी बोललं गेलं. आतापर्यंत जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांच्याविरोधात कारस्थान झालं, तेव्हा तेव्हा त्या खंबीरपणे त्याला सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही. काहीही केलं तरी त्या खचत कसं नाही हीच त्यांची पोटदुखी आहे. इतक्या खालच्या पातळीवरील टीका ऐकूनही ती खचली नाही, मात्र, ती उद्विग्न झाली आहे. मी तिला इतकं उद्वीग्न झालेलं मी आतापर्यंत कधी पाहिलं नाही.”

या टीकेमुळे पंकजा मुंडे खिन्न झाल्या आहेत. तिला ही टीका सहन झाली नाही. पंकजा मुंडेंनी राजकारण सोडावं म्हणून हे होत आहे. मात्र, त्यांचं राजकारण सोडणं बीडला परवडणारं नाही. असं झालं तर बीडच्या अनेक पिढ्यांचं नुकसान होईल. त्यांनी गोपीनाथ मुंडेंची परंपरा समर्थपणे पुढे नेली आहे, असंही मत प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलं.

विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या घरासमोर उपस्थित असलेल्या अनेक महिलांनी यावेळी आम्ही पंकजा मुंडे यांच्यासोबत असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: