मुंबई : महाराष्ट्रावर ‘कोरोना’ची आपत्ती ओढवली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणारे भाजप नेते निरंजन डावखरे यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खडे बोल सुनावले आहेत. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा, असा सल्ला रोहित पवारांनी दिला आहे. 

 

‘राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा. तुमचा एवढा ‘अभ्यास’ व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी?’ असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला. अभ्यास या शब्दाला अधोरेखित करत रोहित पवारांनी फडणवीसांच्या ‘अभ्यास सुरु आहे’ या प्रसिद्ध वाक्यावरही टोला लगावला.

 

राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेले नेते निरंजन डावखरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्तुती करणारं ट्वीट काल केलं होतं. ‘सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.’ असं डावखरे म्हणाले होते.

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही डावखरेंच्या ट्वीटचा समाचार घेतला होता. ‘असल्या राजकारण्यांना पहिले quarantine केले पाहिजे. तुमच्या नेत्यांना Wuhan, Spain किंवा Italy मध्ये घेऊन जा.’ असं सरदेसाई म्हणाले होते.                                      

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: