भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा संघ दुसऱ्या डावात 210 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे या सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. पण असे असले तरी त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात एक अनोखा विक्रम रचला आहे.

या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला विजयासाठी 468 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना रविवारी दुसऱ्या डावात 13 व्या षटकात वेस्ट इंडीजचा फलंदाज डॅरेन ब्रावोच्या हेल्मेटला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चेंडू लागला. पण ब्रावोने तिसऱ्या दिवसाखेर(रविवारी) पर्यंत फलंदाजी केली.

मात्र चौथ्या दिवशी(सोमवारी) फलंदाजीला उतरल्यानंतर त्याला त्रास होत असल्याने तो 23 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे वेस्ट इंडीजने 1 ऑगस्ट पासून आयसीसीने लागू केलेल्या कन्कशन सब्सटीट्यूट(बदली खेळाडू) या नवीन नियमानुसार ब्रावोला उर्वरित सामन्यातून बाहेर केले. तसेच चालू डावात जर्मन ब्लॅकवूडची बदली खेळाडू म्हणून संघात निवड केली.

त्यामुळे वेस्ट इंडीजकडून या डावात 12 खेळाडूंनी फलंदाजी केली. ब्लॅकवूडने 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 72 चेंडूत 38 धावा केल्या. त्यामुळे क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच झाले की एका डावात 12 खेळाडूंनी फलंदाजी केली आहे.

विशेष म्हणजे आयसीसीच्या या नवीन नियमानुसार ब्रावो आणि ब्लॅकवूडने  या सामन्यात केलेल्या प्रत्येकी धावा त्यांच्या कसोटी कारकिर्दीत जोडल्या जाणार आहेत.

आयसीसीचा हा नियम सांगतो की जर सामन्यात एखादा खेळाडू चेंडू लागून दुखापतग्रस्त झाला तर चालू सामन्यात त्याचा बदली खेळाडू संघात सामील करता येईल. पण जर दुखापतग्रस्त खेळाडू फलंदाज असेल तर बदली खेळाडूही फलंदाजच असायला हवा. म्हणजेच ज्या खेळाडूची जी भूमीका असेल तसाच बदली खेळाडू असायला हवा.

याआधी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सर्वप्रथम या नियमाचा उपयोग करण्यात आला होता. दुसऱ्या ऍशेस कसोटीतील पहिल्या डावात जोफ्रा आर्चरचा चेंडू लागून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाला होता.

त्यामुळे तो उर्वरित सामन्यातून बाहेर पडला. त्याच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्यूशानेची बदली खेळाडू म्हणून निवड केली. लॅब्यूशानेने या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी केली होती.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: